Rajhans Podcasts
वास्तविकतेचे रंग
ही कहाणी आहे आजच्या काळाची, भोवतालच्या वर्तमानाची अन् या वर्तमानात वावरणार्या व्यक्तींची, समाजाची, जनसमूहाची आणि जनमानसाची. ही कहाणी आहे एका धैर्यवान मुलीची. प्रतिकूल परिस्थितीत जन्म, पण तिच्यावर मात करणारी जिद्द. शिक्षणाने दिलेली क्षमता अन् सामर्थ्य. त्यातून लाभलेल्या आत्मविश्वासातून ती लढायला शिकली. लढा जातिभेदाशी. लढा लोकांच्या पूर्वग्रहांशी. आपली स्वप्नं वास्तवात आणताना येणार्या अडथळ्यांशी. आपलं भविष्य घडवताना त्याला डागाळणार्या वर्तमानाशी. या लढ्यात तिला यश मिळालं का? या लढ्यात तिला आपल्या जोडीदाराची किती साथ मिळाली ? की वर्तमानातल्या विटक्या रंगांनी तिच्या स्वप्नांना डागाळून टाकलं? आजच्या समस्यांची गुंतागुंत उलगडत व्यामिश्र वर्तमानाचा वेध घेणारी कादंबरी म्हणजे दिलीप फडके लिखित वास्तविकतेचे रंग.
नृत्यमय जग, नर्तनाचा धर्म
कथक नृत्यांगना शमा भाटे यांच्या नृत्यमय जीवनाची ही गाथा! आपल्या प्रतिभावान निर्मितीमधून आणि नृत्यतपस्येतून भारतीयच नव्हे, तर विदेशी नृत्यक्षेत्रातही आपली नाममुद्रा कोरलेल्या श्रेष्ठ कलावतीच्या प्रौढ प्रगल्भ तरीही नर्मविनोदी शैलीतून ही गाथा वाचणं म्हणजे आपली रसिकता समृद्ध करणं! लय-नाद-ताल यांच्यामध्ये सार्थक सापडलेल्या या कलावतीच्या आत्मचरित्रात आपल्याला गेल्या पाच दशकांची सांस्कृतिक स्पंदनेही जाणवतील. शमा भाटे यांचा 'नाद-रूप' प्रवास म्हणजे हे आत्मचरित्र ! नृत्यमय जग्... नर्तनाचा धर्म...
आरोग्य स्वराज्य
स्वस्थ कोण ? जो ‘स्व’ मध्ये स्थित आहे, तो स्वस्थ म्हणजेच निरोगी. याचा अर्थ आरोग्य स्वत:वर अवलंबून असते. जो स्वत:मध्ये स्थित नाही, तो अ-स्वस्थ म्हणजेच आजारी. रोगी दुसर्यांवर अवलंबून असतो. ‘स्वस्थ’ शब्दामध्ये परावलंबनापासून स्वातंत्र्य हा अर्थ गर्भित आहे. ‘स्वराज्य’ म्हणजे स्वत:चे राज्य नसून ‘स्व’वर राज्य, स्वत:चे नियंत्रण. स्वस्थ व स्वराज्य दोन्ही मिळून नवी संकल्पना तयार होते – आरोग्य-स्वराज्य ! म्हणजेच आपल्या आरोग्यावर आपली सत्ता. व्यक्ती, कुटुंब, गाव व देश यांनी आरोग्य-स्वराज्य या मार्गावर वाटचाल कशी करायची ? सांगत आहेत, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. अभय बंग.