‘राजहंस प्रकाशना’ ची वाटचाल सुरू झाल्याला आज सात दशकांकाहून अधिक काळ लोटला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी १९५२ मध्ये ‘राजहंस’ ची स्थापना केली. पुढे १९५७ साली श्री. ग. माजगावकर यांनी बाबासाहेबांसोबत कामाला सुरूवात केली. पुढे या दोघांच्या प्रयत्नातून ही प्रकाशनसंस्था वाढत गेली. प्रकाशनाच्या प्रारंभीच्या काळातच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘राजा शिवछत्रपती’ हे शिवचरित्र ‘राजहंस प्रकाशना’तर्फे प्रसिद्ध झाले.‘राजहंस प्रकाशना’चे संवर्धक श्री.ग.माजगावकर यांची सजग सामाजिक जाणीव, वैचारिक मोकळेपणा, निरनिराळ्या राजकीय आणि सामाजिक चळवळींबद्दलची आस्था या साऱ्यांचा ठसा ‘राजहंस प्रकाशना’च्या पुस्तकांच्या विषयनिवडीपासून जाणवत होता. प्रेरणादायी चरित्रे आणि आत्मचरित्रांचे समृद्ध दालन, राजकीय व ऐतिहासिक विषयांवरील व समाजकारणावरील प्रभावी पुस्तके ही साहजिकच ‘राजहंस’ ची ठळक वैशिष्ठ्ये ठरली. १९६६ साली श्री.ग. माजगावकरांचे धाकटे बंधू दिलीप माजगावकर 'राजहंस'मध्ये दाखल झाले आणि आता ते संस्थेचे संचालक म्हणून काम पाहतात. पुस्तकनिर्मितीबरोबरच पुस्तकवितरण आणि विक्री या घटकांचा विचार करून त्यावर योग्य तो भर द्यायला हवा, असे दिलीपरावांचे मत होते. त्य़ांनी या दृष्टीने विचार करायला सुरूवात केली. ‘राजहंस प्रकाशना’चे सामाजिक बांधिलकीचे धोरण, वाचकाला सकस वैचारिक आशयसंपन्न साहित्य देण्याची धडपड या गोष्टी एका बाजूला जपत असतानाच भिन्न थरांतले सुजाण, चोखंदळ, रसिक वाचक आणि ‘राजहंस प्रकाशना’चे नवे-जुने लेखक यांच्याबरोबरच्या संवादातून वाचकाची आवडनिवड जागरूकतेने जाणण्याचाही दिलीप माजगावकरांचा प्रयत्न होता. वर्तमानाच्या समस्या, क्षितिजावर डोकावत असलेली विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीची किरणे, नव्या पिढीच्या नव्या गरजा, त्यांच्यापुढे उभ्या ठाकणाऱ्या नव्या प्रश्नांची नवी उत्तरे – नव्या शक्यता या सा-यांचा मागोवा घेणारी पुस्तके ‘राजहंस’च्या यादीत समाविष्ट होऊ लागली. ‘राजहंस’च्या आधीच्या दालनांना विज्ञान, पर्यावरण, अंधश्रध्दानिर्मूलन अशा अन्य विभागांची जोड मिळाली. ललित वाड्.मयातील नव्या नावांना अन् नव्या प्रवाहांना ‘राजहंस’ने प्रथितयश साहित्यिकांच्या हातात हात मिळवून पुढे आणले. या साऱ्या वाटचालीत दिगमांच्या पत्नी रेखा माजगावकर यांची त्यांना भक्कम साथ लाभली. नवे विषय आणि नवे लेखक यांबाबत ‘राजहंस प्रकाशन’ नेहमीच स्वागतशील राहिले आहे. ‘राजहंस प्रकाशना’ने वाचकांपुढे आणलेल्या अनेक लेखकांनी त्या त्या क्षेत्रांतील आपल्या कामाने आणि त्यासंबंधीच्या पुस्तकलेखनाने अत्यंत आगळीवेगळी कामगिरी उभी केली. ‘राजहंसी’ ग्रंथसूचीमध्ये सर्व वाड्:मयप्रकार आहेत, पण त्यातही चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, समाजकारण, राजकारण आणि विज्ञान ही 'राजहंस प्रकाशना'ची नाममुद्रा उमटलेली खास दालने आहेत. ‘राजहंस प्रकाशना’तर्फे आत्तापर्यंत शेकडो पुस्तके प्रकाशित झाली आहेत. संपादक मंडळ ही 'राजहंस'ची कायमच भक्कम बाजू राहिली आहे. या संपादकांमध्ये विविध विषयांवर प्रभुत्व असणाऱ्या जाणत्या संपादकांचा समावेश ही 'राजहंस'ची खासियत आहे. आनंद हर्डीकर, विनया खडपेकर, शिरीष सहस्रबुद्धे, करुणा गोखले, डॉ. सदानंद बोरसे, हे 'राजहंस'च्या पुस्तकांच्या संपादनाचे काम अतिशय चोखपणे पार पाडत आहेत. याबरोबरच शिरीष शेवाळकर 'राजहंस'च्या पुस्तकांचे निर्मितिप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतात.
२०२० पासून 'राजहंस'ने डिजिटल विश्वातही आपला ठसा उमटवला आहे. संकेतस्थळावरून पुस्तकांची विक्री करणे, समाजमाध्यमाव्दारे पुस्तकांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे तसेच 'राजहंस'च्या अॅप्लिकेशनची निर्मिती अशा एक ना अनेक गोष्टी 'राजहंस'ने २०२० पासून सुरू केल्या आहेत. या सर्वांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचणे हाच मुख्य उद्देश असल्याने दि.ग.मा. यांनी या सर्व उपक्रमांना सुरूवातीपासूनच प्रोत्साहन दिले आहे. वयाच्या ८० व्या वर्षातही तरुणाला लाजवेल, अशा उत्साहाने नव्या प्रवाहांशी, नव्या तंत्रज्ञानाशी नाते जोडण्याचे दि.ग.मा. यांचे कसब वाखाणण्याजोगे आहे. या सर्व कामगिरीमुळे आतापर्यंत ‘राजहंस प्रकाशना’ला राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राज्यातील व राज्याबाहेरीलही मराठी वाचक जोडायचा असेल तर पुण्याबरोबरच इतर शहरांमध्येही शाखा सुरू करणे आवश्यक आहे. हाच विचार करून 'राजहंस'ने मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि गोवा याठिकाणी शाखाविस्तार केला आहे.
'राजहंस'ला मिळालेले पुरस्कार
-
- प्रकाशन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या ‘वि.पु.भागवत पुरस्कारा’साठी निवड १९९१.
- राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘सिनेमाची गोष्ट’ या पुस्तकासाठी राष्ट्रपती पुरस्कार १९९३.
- ‘स्नेहवर्धन प्रकाशन’तर्फे निर्मला गोपाळ किराणे यांच्या नावाने दिला जाणारा ‘प्रकाशक मित्र उत्कृष्ट निर्मिती ग्रंथ श्रेष्ठता पुरस्कार’ २००६.
- ‘मराठवाडा साहित्य परिषदेचा’ रा.ज.देशमुख पुरस्कार २००७.
- ‘फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स’, नवी दिल्ली यांच्यातर्फे दिला जाणारा ‘डिस्टिंगविश ॲवॉर्ड’ २००८.
- ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’, पुणे व ‘राजेंद्र बनहट्टी पुरस्कृत’ कै.पुष्पा पुसाळकर पुरस्कार २०१२.
- ‘शनिवार वाडा कला महोत्सव’ यांच्या तर्फे प्रकाशन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन गौरव. २०१३.
- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई 'श्री.पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार २०१३'.
- महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे 'म.सा.प.जीवन गौरव पुरस्कार २०१९'.
- आखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ,पुणे तर्फे 'जीवन गौरव पुरस्कार २०२०'.
श्री.ग. माजगावकर
संचालक
दिलीप माजगावकर
संचालक
रेखा दिलीप माजगावकर
संचालक
- २७ वर्षे देना बँकेत काम केले.
- १० वर्षे गरवारे बाल भवन (Recreation Centre) काम
- २००८ पासून ‘राजहंस प्रकाशना’चे संचालक म्हणून कार्यरत.
- सामाजिक बांधिलकीचे भान
डॉ. सदानंद बोरसे
संचालक-संपादक
1977 पासून ‘माणूस’ साप्ताहिकामध्ये स्तंभलेखन.
1985 पासून ‘राजहंस प्रकाशना’साठी संपादकीय कार्य.
‘राजहंस ग्रंथवेध’मध्ये ‘भाषा-विचार’ सदर.
आनंद वासुदेव हर्डीकर
संपादक
1969 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात विविध वृत्तपत्रांतून व नियतकालिकांमधून आजपर्यंत सुमारे 2300 लेख प्रसिध्द.
संपादकीय कामाचा विविधांगी अनुभव.
विमुक्त पत्रकार या नात्याने विविध नियकालिकांप्रमाणेच सुमारे 100 स्मरणिकांचे संपादन.
विनया खडपेकर
संपादक
ऑगस्ट १९७७ वसंत मासिकात पहिला लेख : दलित साहित्याविषयी थोडेसे
जानेवारी १९७८ पासून मार्च १९८३ पर्यंत माणूस साप्ताहिकात रंगभूमी सदरात नाटक अभिप्राय लेखन. याच साप्ताहिकात मुंबई वार्ता, स्वयंसेवी संस्थांचे कायकर्ते, नाटककार यांच्या मुलाखतीही सादर केल्या.
करुणा गोखले
संपादक
एम.ए. (रशियन भाषा) (पुणे विद्यापीठ)
पी.एच.डी. (भाषाशास्त्र) (अलबेरीया- कॅनडा विद्यापीठ)
स्वतंत्र पुस्तकांचे लेखन
- शुभमंगल पण सावधान – २००१
- बाईमाणूस – २०१०
- चालता-बोलता माणूस – २०१७
शिरीष सहस्रबुद्धे
संपादक
कार्यानुभव
- माणूस नियतकालिकातून लेखनाला सुरुवात, किर्लोस्कर आणि मनोहर अशा नामांकित नियतकालिकांमध्ये लेखन.
- सकाळ पेपर्स प्रा.लि आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर या नामांकित संस्थांमध्ये अधिकार पदावर काम केले आहे.
शिरीष शेवाळकर
संचालक, निर्मितिप्रमुख
कार्यानुभव
- बजाज ऑटो, जॉन्सन कन्ट्रोल्स, लिअर कॉर्पोरेशन, इंगरसोल रॅंड, अॅडिएंट, टाटा फिकोसा अशा नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम.
- मुख्य कार्यकारी अधिकारी, व्हाईस प्रेसिडेंट, संचालक पदांवर काम.
- चीन, इंडोनेशिया आणि थायलंड देशांतही कामाचा अनुभव .
- ‘राजहंस’मध्ये निर्मितिप्रमुख म्हणून कार्यरत.