* शास्त्रीय गायिका माणिक भिडे आणि गोविंद भिडे हे अश्विनी भिडे यांचे आई-वडील. मुंबईमध्ये संगीताची परंपरा असलेल्या घराण्यात जन्मलेल्या भिडे यांचे शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण पंडित नारायणराव दातार यांच्याकडे झाले.
* त्यांनी गांधर्व महाविद्यालयातून ‘संगीत विशारद’ ही पदवी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी घेतली. तेव्हापासून त्या आपली आई माणिक भिडे यांच्याकडून जयपूर-अत्रौली घराण्याची तालीम घेत आहेत.
* त्यांनी २००९ पर्यंत रत्नाकर पै यांच्याकडूनसुद्धा मागर्दर्शन घेतले. भिडे-देशपांडे यांनी सूक्ष्मजीवशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातून जैवरसायनशास्त्रात पीएच.डी. मिळवली आहे. डॉक्टरेट मिळवेपर्यंत भिडे-देशपांडे यांनी संगीतातील व्यावसायिक कारकीर्दीचा विचार केलेला नव्हता.
*** सांगीतिक कारकीर्द
* जयपूर-अत्रौली, मेवाती आणि पतियाळा या घराण्याच्या प्रभावातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र गायनाची शैली तयार केली आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच ठुमरी, दादरा हे उपशास्त्रीय गायन प्रकारसुद्धा त्या गातात. त्यांच्या संस्कृत भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी अनेक स्तोत्रे, स्तुती यांचे गायन केले आहे.
* बंदिश आणि बंदिश रचना या विषयांचे भिडे-देशपांडे यांना सखोल ज्ञान आहे. त्यांनी स्वतः अनेक बंदिशी रचल्या आहेत. या रचना राग रचनांजली ( २००४) या पुस्तकामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. २०१० मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्याच्या पुढच्या भागात राग रचनांजली २ मध्ये आणखी ९८ बंदिशी आहेत.
* भिडे-देशपांडे यांनी जगभरातील अनेक संगीत संमेलनांमध्ये आणि मैफिलींमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. त्यामध्ये पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, भुवनेश्वर, ओरिसा येथील राजा राणी महोत्सव, पुण्यातील गान सरस्वती महोत्सव यांचा समावेश आहे.
* त्या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या टॉप ग्रेड गायिका आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय कार्यक्रम आणि आकाशवाणीच्या संगीत संमेलनामध्ये सहभाग घेतला आहे.
* त्या अनेक शिष्यांना आपल्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायकीचे शिक्षण देत आहेत तसेच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्या अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये शास्त्रीय संगीतावर व्याख्याने - प्रात्याक्षिके देतात.
* भारतीय शास्त्रीय संगीतातील मूर्च्छना पद्धतीवर आधारित जसरंगी जुगलबंदी म्हणजे एकाच वेळी स्त्री आणि पुरुष गायकाने दोन वेगवेगळे राग सादर करण्याची पद्धत. अश्विनी भिडे- देशपांडे यांनी संजीव अभ्यंकर यांच्याबरोबर अनेकवेळा जसरंगी जुगलबंदीचे सादरीकरण केले आहे.
*** पुस्तके
* राग रचनांजली (राजहंस प्रकाशन २००४) - स्वरचित बंदिशींचे पुस्तक आणि सीडी[४]
* राग रचनांजली - भाग २ (राजहंस प्रकाशन २०१०) - स्वरचित बंदिशींचे पुस्तक आणि सीडी
* मादाम क्युरी (ग्रंथाली प्रकाशन २०१५) - इव्ह क्युरी यांनी लिहीलेल्या मेरी क्युरी यांच्या चरित्राचा मराठी अनुवाद
*** पुरस्कार व सन्मान
* ऑल इंडिया रेडीओ संगीत स्पर्धेत राष्ट्रपतींचे सुवर्णपदक (१९७७
* संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०१४)
* राष्ट्रीय कुमार गंधर्व सन्मान (मध्य प्रदेश सरकार, २००५)
* संगीत रत्न पुरस्कार (सह्याद्री दूरदर्शन, २०१०)
* सांस्कृतिक पुरस्कार (महाराष्ट्र राज्य, २०११)
* गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर सन्मान (२०१४)
* पंडित जसराज गौरव पुरस्कार ()
* संगीत शिखर सन्मान (२०१८)
* वत्सलाबाई जोशी पुरस्कार (२०१९, पुणे)