Domel te Kargil | डोमेल ते कारगिल
'१९४७ साली भारतात जसे स्वातंत्र्याचे वरदान लाभले, तसाच विभाजनाचा शापही मिळाला. त्या शापाची बोच कमी होती म्हणून की काय, नवोदित पाकिस्तानने जम्मू काश्मीर बळकावण्याचा खुनशी डाव भारताला सशस्त्र संघर्षात खेचले. त्या सीमावर्ती संस्थानाने अगतिक होऊन स्वसंरक्षणार्थ भारताकडे धाव घेतली. विलीनीकरणाची संवैधानिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भारताने आक्रमकांना मागे रेटण्यासाठी लष्करी मोहीम आरंभली. ती अंशतः यशस्वी झालेली असतानाच युध्बंदी करार झाला. ते युध्द थांबले, पण संघर्ष शमला नाही. तो जीवघेणा संघर्ष आजतागायत चालूच आहे, त्याचे स्वरूप बदलले आहे, विस्तारले आहे. दोन्ही देशांच्या अस्तित्वाचा तात्त्विक मूलाधार ठरलेल्या जम्मू-काश्मीरच्या भूमीवर चार युध्दे खेळली जाऊनही खरीखुरी शांतता दृष्टिपथातही येऊ शकलेली नाही. पाकिस्तानने पुकारलेल्या परभारी युध्दाचा रंगही बदलत, अधिक गडदगहिरा होत चालला आहे. दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या या समस्येचा अत्यंत मूलगामी वेध घेणारा ग्रंथ म्हणजेच ‘डोमेल ते कारगिल’ ! पाकिस्तानने फंदफितूरीने डोमेल ही पहिली सीमावर्ती चौकी बळकावली, तेव्हापासून सुरू झालेल्या आणि भारतीय सेनादलांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पाक घुसखोरांपासून कारगिलचा टापू मुक्त केला, तोपर्यंत(किंबहुना त्यानंतरही) चालूच राहिलेल्या एका रौद्रभीषण संघर्षाची ही रोमांचक कथा आहे. इतिहास घडवणा-या भूगोलाचे, रणांगणावरच्या लहानमोठ्या मोहिमांचे, उभय पक्षांच्या व्यूहरचनेतल्या डाव-प्रतिडावांचे, प्रतिकूल निसर्गावर मात करणा-या जिद्दी सैनिकांच्या बलिदानी पराक्रमाचे तपशीलवार विवेचन हे तर या ग्रंथाचे ठळक वैशिष्टय आहेच; पण प्रतिशोधाच्या भावनेने पेटून उठलेल्या पाकिस्तानने गेली दहा-बारा वर्षे जे परभारी युध्द पुकारले आहे, त्याचे मर्मभेदी विश्लेषण हेसुध्दा या ग्रंथाचे तितकेच महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. नंदनवनातील राजकीय-सामाजिक परिस्थितीचे, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजनैतिक हालचालींचे बदलते रंगही नेमकेपणाने टिपणारा हा ग्रंथ काश्मीर समस्येबद्दलचे सर्व वाचकांचे आकलन समृध्द करील, यात शंकाच नाही. सूर्यकुलाचा दिव्य वारसा सांगणा-या लढवय्या लेखकाचा हा पहिलाच ग्रंथ युध्दविषयक मराठी साहित्याचे दालन समृध्द करणारा ठरावा, अशाच तोलामोलाचा आहे. '
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : डिसेंबर २०००
- सद्य आवृत्ती : ऑगस्ट २०१६
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'