अशोक चंदनमल जैन (जन्म : घोडेगाव, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत, ११ एप्रिल १९४४; - मुंबई, १८ फेब्रुवारी २०१४) हे एक मराठी पत्रकार व लेखक होते. ते काही काळ महाराष्ट्र टाइम्स या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक होते.
*** पत्रकारिता आणि साहित्यिक कारकीर्द
* इ.स. १९६४ साली जैन यांनी बी.ए.ची पदवी मिळवली महाविद्यलयात असतानाच त्यांनी पुण्यातील दैनिक सकाळमधून पत्रकारितेचे धडे गिरवायला सुरुवात केली. पुढे पुण्यातील दैनिक तरुण भारतमध्ये काम केल्यानंतर ते केसरीमध्ये रुजू झाले . इ.स. १९६६ साली अशोक जैन यांनी मुंबईला स्थलांतर करून महाराष्ट्र टाइम्समध्ये काम मिळविले.
* मुंबईत १२ वर्षे काम केल्यावर अशोक जैन हे महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी म्हणून दिल्लीला गेले. इ.स. १९७८ ते इ.स. १९८९ या काळात त्यांनी दिल्लीहून 'राजधानीतून' या नावाने साप्ताहिक वार्तापत्रे लिहिली. जैन यांची चौफेर दृष्टी, विचक्षणपणा, आणि त्यांच्या खेळकर शैलीने ही वार्तापत्रे चांगलीच गाजली.
* इ.स. १९८९ साली महाराष्ट्र टाइम्सचे सहसंपादक झाल्यावर मटाच्या 'मैफल' या साप्ताहिक पुरवणीची जबाबदारी अशोक जैन यांना देण्यात आली. विषयवैविध्य आणि नावीन्य यांमुळे या पुरवणीला त्यांच्या काळात प्रतिष्ठा मिळाली. अशोक जैन पुढे महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहसंपादक आणि कार्यकारी संपादकही झाले.
* अशोक जैन यांनी कलंदर या टोपणनावाने 'कानोकानी' हे राजकीय-सामाजिक-साहित्यिक-सांस्कृतिक घटना-घडामोडींवर मिश्कील टिप्पणी करणारे सदर लिहायला सुरुवात केली. पुढे 'कानोकानी' या त्यांच्या सदरातील लेखांचे त्याच नावाचे पुस्तक झाले. पुस्तकाचा पुढचा भागही 'आणखी कानोकानी' या नावाने प्रकाशित झाला.