To Pravas Sundar Hota | तो प्रवास सुंदर होता (कुसुमाग्रज-वि.वा.शिरवाडकर जीवन आणि साहित्य)
'कुसुमाग्रज - वि. वा. शिरवाडकर - आपल्यातून गेल्याला दोन वर्षे होतील. ते देहरूपाने अंतरले असले, तरी त्यांच्या साहित्यातून, आठवणींतून ते आपल्यात आहेतच. त्यांच्या साहित्यावर पुष्कळसे लिहिले गेले असले, तरी त्यांच्या समग्र साहित्यावरील चांगल्याशा परिचय-परामर्शात्मक ग्रंथाची उणीव भासतच होती. त्यांचे सलग असे प्रमाण चरित्रही नव्हते. ते काम प्राचार्य डॉ. के. रं. शिरवाडकरांच्या तो प्रवास सुंदर होता या ग्रंथाने केले आहे आणि ही उणीव चांगल्या प्रकाराने दूर केली आहे. केशवराव शिरवाडकर हे तात्यांचे धाकटे बंधू, त्यामुळे ग्रंथाला वैयक्तिक जिव्हाळयाचा ओलावा लाभला आहे आणि अधिकृतताही आली आहे. परंतु केशवराव हे उत्तम समीक्षकही आहेत. त्यामुळे या ग्रंथातील विवेचनात आवश्यक तेवढी अलिप्तता, तटस्थताही आली आहे. आत्मीयता आणि अलिप्तता यांच्या संमीलनाचा हा दुर्मिळ योग आहे. केशवरावांनी आपल्या पुस्तकामध्ये कुसुमाग्रजांच्या जीवनप्रवासाचा बालपणापासून मागोवा घेतला आहे. सामाजिक जाणीव, एकाकीपणा, माणूसवेड, मिस्कीलपणा, कलंदर वृत्ती, संकोची स्वभाव, दूरस्थता, प्रेम, सहिष्णुता अशा विविध आणि पुष्कळ वेळा विरोधीही प्रवृत्तींचा सुंदर गोफ म्हणजे तात्यासाहेबांचे जीवन. त्याचे सुरेख चित्रण आपल्याला तो प्रवास सुंदर होता मध्ये मिळते. या ग्रंथामध्ये कुसुमाग्रजांचे चरित्रकथन आणि साहित्य-परामर्श एकमेकांत इतके मिसळून गेले आहेत की, त्यातून एक इंद्रधनूचा सुंदर गोफ विणला गेला आहे. हा ग्रंथ वाचताना कुसुमाग्रजांचे जीवन आणि साहित्य एकमेळाने उभे राहते आणि एका उदास आनंदाने चित्तवृत्ती भारून जातात. सु. रा. चुनेकर '
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मार्च २००१
- सद्य आवृत्ती : जानेवारी २०१३
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'