Shokatma Vishwarup Darshan | शोकात्म विश्वरूप दर्शन
'डॉ. स. रा. गाडगीळ यांचा शोकात्म विश्वरूप दर्शन हा ग्रंथ त्यांच्या वैचारिक यात्रेतील एक उत्तुंग दीपस्तंभच आहे. त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या अशा या प्रकल्पाचा आवाका छाती दपडून टाकणारा आहे. इस्किलस, सॉफक्लिस, युरिपिडीज यांची अमर अशी ग्रीक शोकनाटये, इंग्लंडमधील शेक्सपीअरची सा-या जगात गाजलेली शोकनाटये, आधुनिक युगातील इब्सेनची सामाजिक समस्याप्रधान शोकनाटये (नॉर्वे), आणि शेवटी भारतातील युगान्त शब्दांकित करणारे व्यासांचे महाभारत हे शोकात्म महाकाव्य हा जागतिक साहित्यातील अमर ठेवा डॉ. गाडगीळांच्या ग्रंथातील अभ्यासाचा विषय आहे. डॉ. गाडगीळांनी आपल्या या ग्रंथात या चारही भूप्रदेशांतील शोकात्म साहित्याचे अतिशय प्रभावी भाषाशैलीत रसग्रहणपूर्वक विश्लेषण केले आहे. इस्किलसचे सप्लायंट विमेन, महानाटय प्रॉमिथ्यूस बाउंड, ऑरेस्टिआ हे त्रिनाटय, सॉफक्लिसचे अॅटिगनी आणि जगातील सर्वश्रेष्ठ शोकनाटय ईडिपस, युरिपिडीजचे काव्यसौंदर्याने बहरलेले हिप्पॉलिटस, इब्सेनचे अ डॉल्स हाउस, व्हेन वुइ डेड अवेकन आणि शोकात्म घटनांनी युगान्त घडविणारे महाभारत या वैभवसंपन्न अशा ज्या कलाकृतींचा डॉ.गाडगीळांनी आपल्या या ग्रंथात रसग्रहणपूर्वक परिचय करून दिला आहे ती जागतिक वाड्.मयातील अत्युच्च शिखरेच आहेत. अशा अभिजात साहित्याची समीक्षा, रसज्ञता आणि जीवनविषयक तत्त्वचिंतन या पायावरच उभारली जाऊ शकते. प्रा. गो. वि. करंदीकरांनी केलेले अॅरिस्टॉटलच्या पोएटिक्स या मौलिक ग्रंथाचे अप्रतिम भाषांतर आणि त्यावरील विद्वत्तापूर्ण भाष्य या ग्रंथानंतर मराठीत या विषयासंबंधी डॉ. गाडगीळांनी केलेली सखोल आणि परिपूर्ण चर्चा इतरत्र क्वचितच आढळेल. ईडिपसच्या शापकथेचा सांस्कृतिक मानववंशशास्त्राच्या आधारे डॉ. गाडगीळांनी लावलेला अर्थ अगदी स्वतंत्र आणि नव्याने प्रकाशात आला आहे. त्याचप्रमाणे पांडवांचे आणि ईडिपसचे झालेले स्वर्गारोहण या घटनेचा गाडगीळांनी नव्याने लावलेला अर्थ असाच अभिनव आहे. शोकात्म नाटयाचा शेवट शोकाचे विरेचन करणारा (कॅथार्सिस) असला पाहिजे या वैश्विक संकल्पनेतून ही स्वर्गारोहणाची कल्पना उदयाला आली असली पाहिजे, ही डॉ. गाडगीळांची कल्पना मार्मिक आहे. डॉ. गाडगीळांचा शोकात्म विश्वरूप दर्शन हा ग्रंथ शोकात्म साहित्यसमीक्षेत बीजग्रंथ ठरणार आहे. रसिक वाचक-अभ्यासकांना गाडगीळांचा हा ग्रंथ काहीशी नवी दिशा दाखविणारा वाटेल! '
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मार्च २०००
- सद्य आवृत्ती : डिसेंबर २०००
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'