Rangancha Jadoogar | रंगांचा जादूगार
‘दीनानाथ दलाल’ ही सात अक्षरे म्हणजे सप्तरंगांनी नटलेले इंद्रधनुष्यच ! त्यांच्या कुंचल्यातून उमटणाऱ्या रेषा कधी कुसुमकोमल नजाकतीचे वळण दाखवत, तर कधी तळपत्या तिखट तलवारीची तेज धार कॅन्व्हासवर उमटवत. अवघे बावन्न वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या प्रतिभावंत चित्रकाराने चित्रकलेच्या विविध प्रांतांमध्ये आपली अमिट नाममुद्रा उमटवली. केवळ अभिजनवर्गाच्या आलिशान भिंतींवरील सोनेरी-रुपेरी चौकटीत आपली कला बंदिस्त न करता दीनानाथ दलालांनी जनसामान्यांच्या घराघरात आणि मनामनात आपली चित्रे पोहोचवली. स्वत:चे कर्तृत्वक्षेत्र केवळ चित्रकलेपुरतेच मर्यादित न ठेवता त्यांनी ‘दीपावली’ या नियतकालिकाच्या रूपाने साहित्याच्या प्रांगणामध्येही आपला नंदादीप तेवता ठेवला. विविध प्रयोगांमधून कलेची वेगवेगळी क्षितिजे धुंडाळणाऱ्या या रंगरेषाप्रभूच्या जीवनाचे वेगवेगळे पैलू दर्शवणारे वेधक चरित्र.