Magova | मागोवा
प्रमाणलेखन' हा भाषेचा पायाभूत घटक असला, तरी त्याकडे नेहमीच
दुर्लक्ष होत आलेले आहे. अशा पार्श्वभूमीवर डॉ. नागेश अंकुश यांचा
'मागोवा : प्रमाण मराठी भाषेच्या प्रमाणलेखनाचा इतिहास' हा ग्रंथ विशेष
महत्त्वपूर्ण ठरतो. या अभ्यासपूर्ण संशोधनपर ग्रंथात ते मराठी भाषेच्या
विकासाची नोंद घेताना निर्दोष लेखनाच्या चारशे वर्षांच्या जडणघडणीचा
साक्षेपी आढावा घेतात. प्रमाणलेखनाचे नियम सांगून थांबण्याऐवजी ते
भाषिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचे समतोल विवेचन करतात. निर्दोष
लेखनपरंपरेचा उगम, प्रवास आणि तिच्यामागील भाषिक विचार यांची
सुबोध मांडणी यातून दिसते. प्रमाणलेखनाला आकार देणाऱ्या विविध
घटकांची समग्र ओळख करून देणाऱ्या या ग्रंथातून मराठी लेखनाच्या
शिस्तबद्धतेची सहज ओळख होते.
डॉ. अंकुश प्रमाणलेखनाकडे केवळ व्याकरणाच्या चौकटीतून नव्हे, तर
भाषेच्या सांस्कृतिक जबाबदारीचा एक भाग म्हणून पाहतात. त्यांच्या
आधीच्या ग्रंथांतील भाषाजागृती 'मागोवा' मध्ये संशोधन आणि चिंतनाच्या
रूपाने प्रकर्षाने जाणवते. विविध संस्थात्मक कार्यांची बारकाईने नोंद घेत
त्यांनी प्रमाणलेखनाशी निगडित अनेक दुर्लक्षित संदर्भ उलगडले आहेत.
मराठीच्या प्रमाणलेखनाचा प्रवास समजावणारा आणि भाषेच्या
उत्कर्षासाठी पायाभूत ठरणारा हा ग्रंथ एक उत्तम असा संदर्भग्रंथ आणि
माहितीकोश ठरतो.
'मागोवा' हा मराठी प्रमाणलेखनाचा परामर्श घेणारा मराठीतील बहुधा
पहिलाच ग्रंथ असावा. प्रमाणलेखनाची जडणघडण आणि वाटचाल
समजून घेण्यासाठी अभ्यासकांपासून ते भाषेवर नितांत प्रेम करणाऱ्या
वाचकांपर्यंत सर्वांनाच तो अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी मला खात्री वाटते.
सुधीर रसाळ
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २०२६
- मुखपृष्ठ : मनोहर दांडेकर
- राजहंस क्रमांक : C-03-2026 (1243 )