Kalo Na Kalo Re | कळो ना कळो रे
श्रीनिवास रामचंद्र उपाख्य अण्णासाहेब बोबडे यांची कविता
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली.
१८८९ ते १९३४ असे अवघ्या चव्वेचाळीस वर्षांचे
आयुष्य त्यांना मिळाले.
केशवसुतांचा मोठा प्रभाव असणारा हा काळ!
मात्र याच काळातली असली तरी वीर आणि शृंगार
अशा दोन्ही रसांचा प्रमत्त आविष्कार करणारी त्यांची
कविता स्वतंत्र प्रतिभेची कविता आहे. ‘विविध ज्ञान विस्तार;
किंवा ‘वागीश्वरी’सारख्या नियतकालिकांमधून त्यांच्या कविता
प्रसिद्ध झाल्या, तरी वाङ्मयविश्वातील झगमगाटापासून ते
स्वाभाविकपणे दूर होते. त्यांच्या कविता संग्रहरूपाने प्रथम
प्रकाशित झाल्या १९३७मध्ये. म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी.
एकीकडे संस्कृत काव्याचे संकेत सांभाळणारी आणि दुसरीकडे
पोवाडे आणि लावण्यांची कास धरणारी, एकीकडे ‘हरहर महादेव’चा
घोष घुमवत वीरश्रीला आवाहन करणारी आणि दुसरीकडे
पहिल्या चुंबनाचा आनंदानुभव सांगत प्रेमाच्या वृंदावनात रास रचणारी
बोबडे यांची कविता आहे. समरांगणात आणि रतिरंगणात ती
सारख्याच चैतन्याने चमकते.
‘ओळख झाली ज्यास स्वत:ची वेद तयास कळो न कळो रे’
असे अंतर्लीन माणसाला अभयाचे मौलिक आश्वासन देणारी
ही कविता खरे तर मराठी वाङ्मयाभिरुचीच्या प्रवासातली
एक लक्षणीय कविता आहे.
अरुणा ढेरे
- पहिली आवृत्ती : ऑगस्ट २०२२
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- मुखपृष्ठ : फाल्गुन ग्राफिक्स
- राजहंस क्रमांक : H-05-2022