किराणा घराण्याची तेजस्वी परंपरा पुढे नेणारे श्री. आनंद भाटे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या विविध शाखांबद्दल आदराची भावना बाळगतात.
'भारतरत्न' पदवीने सन्मानित महान गायक पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य होण्याचा सन्मान श्री. आनंद यांना अगदी तरुण वयातच लाभला. पुढील काळात, सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, तानसेन समारोह, पं. जितेंद्र अभिषेकी संगीत समारोह, सप्तक म्युझिक फेस्टिवल, एनसीपीए संगीत मैफल, लर्नक्वेस्ट म्युझिक कॉन्फरन्स (बोस्टन) अशा अनेक प्रतिष्ठित स्थळी त्यांनी आपली गायनकला सादर केली आहे. १९८४मध्ये शिकागो येथे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या पहिल्या अधिवेशनात त्यांना गायनासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. पुढील काळात अमेरिकेखेरीज ब्रिटन, नेदरलँड्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, यूएई इत्यादी देशांत त्यांनी मैफली सादर केल्या आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन, आणि भारतातील मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, वडोदरा, नागपूर, नांदेड, नाशिक, बंगळुरू, मंगळूर, हुबळी, धारवाड, चेन्नई, इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, देवास, हैदराबाद, कोलकाता, वाराणसी इत्यादी अनेक शहरांत त्यांच्या मैफली झाल्या आहेत.