श्री.विवेक गाडगीळ ह्यांचा जन्म अहमदनगर जिल्हयातील संगमनेर येथे ८ मे १९४८ रोजी झाला.गाडगीळ कुटुंबीय तसे मुळचे कोकणातील राजापुर तालुक्यातील अणसुरे गांवचे.श्री.गाडगीळ ह्यांचे आजोबा शिक्षणासाठी अणसुरे येथून मुंबई तर पुढे वकीली व्यवसाया निमित्त कल्याण नजीकच्या मुरबाड येथे जम बसवुन स्थायिक झालेले.
श्री.विवेक ह्यांचा जन्म डॉक्टर भास्कर आणि कमला गाडगीळ या दांपत्याच्या सुखवस्तु आणि सुसंस्कृत तिन भावांच्या पाठीवर झाला.प्रवरा नदीच्या काठी वसलेल्या छोट्या पण टुमदार गावात जन्म आणि पुढील प्राथमिक शालेय शिक्षण ‘नवीन मराठी शाळा’ व पुढील माध्यमिक व अकरावी पर्यंतचे उच्च शालेय शिक्षण ‘सर डी.एम.पेटीट विद्यालय’ येथे मराठी माध्यमात झाले असले तरी सुसंस्कृत आईवडील,प्रागतिक विचाराचे कौटुंबिक वातावरण,शालेय आयुष्यात मोलाचे संस्कार देणारे शिक्षक व जिवाभावाचे मैतर ही आयुष्यभर साथ देणारी शिदोरी विवेकना लाभली.
शालेय जीवनाच्या सुरवातीपासुनच क्रमिक अभ्यासाबरोबरच मैदानीखेळ,नाट्य,वक्तृत्व,अवांतरवाचन,चित्रकला,स्काउट,
एन.सी.सी व सामाजिक कार्यास आईस हातभार ह्यातही नुसता विशेष रस न घेता विवेकनी प्राविण्यही प्राप्त करुन सर्वांगीण विकसित आयुष्याचा पायाच घातला असे म्हणावयास हरकत नाही. वक्तशीरपणा,शिस्त,जिद्द,राष्ट्राभिमान,धाडस व नेतृत्व ह्या वैयक्तिक गुणांची जोपासना ह्याच काळात झाली.
मे १९६४ मध्ये अकरावीची परीक्षा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवुन उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील महाविद्यालयीन शास्त्रीय शाखेच्या शिक्षणाची संगमनेर येथे सोय नसल्याने पुणे येथील एम.ई.एस महाविद्यालयात प्रवेश घेतला. घरापासुन दूर,वसतिगृहातील वास्तव्य,ग्रामीण भागातुन शहरी वातावरणातील प्रवेश,कॉन्व्हेंट मधुन आलेले व फाडफाड इंग्रजी बोलणारे स्वाध्यायी व गटबाजी इत्यादींचा नकळत कां होईना परीणाम विवेकवर झालाच.नाही म्हणायला सायकल वरील भटंकतीची,चित्रपट पहाण्याची गोडी ह्याच काळात लागली.शिवाय खोखो व एन.सी.सी ह्यातही विशेष चमक दाखविता आली.
तेथुन पुढे औरंगाबाद येथील ‘देवगिरी महाविद्यालय’ येथे पीपीसीचे एक वर्ष करुन सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला.
स्थापत्य शाखेची निवड,यौवन सुलभ जाणीवांची ओळख होवुन त्यातुन उभरलेले व आयुष्यभर टिकलेले, प्राथमिक शाळेपासुन बरोबर असलेल्या, लता काटे हिच्या बरोबरचे प्रेम, मित्रांबरोबर सायकल वरुन अजंठा,वेरुळ व माळोरान केलेली भटकंती,मैदानी खेळ,आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामध्ये घेतलेला भाग,महाविद्यालयीन राजकारण व निवडणुकांत केलेली उमेदवारी,अफाट अवांतर वाचन व सर्वात मह्वाासचे म्हणजे आवडीचे विषय मिळाल्या मुळे केलेली अभ्यासयीन प्रगति.
ह्या सर्वाचा परीपाक म्हणुन जुन १९७१ मध्ये श्री.विवेक हे ‘मराठवाडा विद्यापीठात’ स्थापत्य शाखेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होवून ‘स्थापत्य अभियंता’ झाले.
राष्ट्र उभारणीच्या हेतुने श्री.विवेक ह्यांनी खासगी नोकरीचा मार्ग निवडला. सुदैवाने डिसेंबर १९७१ मध्ये त्यांची निवड ‘लार्सन व टुब्रो’ ह्या कंपनीच्याच बांधकाम संबंधीत उपकंपनी ‘इंजीनीअरींग कन्सट्रक्शन कॉरपोरेशन’ मध्ये साईट इंजीनीअर म्हणून गोवा येथे झाली.
त्यानंतर श्री.विवेक ह्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.गोवा,थूथूकुडी,विशाखापट्टणम,हलदिया,अबुधाबी,इराक, मुंबई,नेपाल अशा देश विदेश भटकंतीच्या काळात यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली.कामावरील निष्ठा,जिद्द,प्रचंड कष्ट,सतत शिकण्याची तयारी,दूरदृष्टी,संकटाचे संधीत रुपांतर करण्याची सकारात्मकता,यशाचे श्रेय आपल्या सहकाऱ्यांबरोबर वाटून घेण्याचा उमदेपणा,प्रकल्प व मानवसंसाधन व्यवस्थापनीतील हातोटी, सहज,नेतृत्व,देवत्वा वरील अढळ श्रध्दा,पापभीरु वृत्ती अशा अनेक गुणांच्या जोरावर विवेक साईट अभियंत्या पासुन कॉरपोरेट शिडीच्या मुख्य कार्यकारी व व्यवस्थापकीय संचालकाच्या हुद्द्या पर्यंत पोहचले.
ऑगस्ट २०१० मध्ये कारकिर्दीतील शिरपेच म्हणूनच की काय कंपनीने हैदराबाद येथील सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण व आव्हानात्मक मेट्रो रेल प्रकल्पाची संपुर्ण जबाबदारी विवेक यांचेवर सोपवली.आर्थिक अनिश्चितता,राजकीय उलथापालथ ह्या सर्वातून कुशल नावाड्या प्रमाणे सुकाणु संभाळत विवेक ह्यांनी ६ वर्षीच्या कालावधीत प्रकल्परुपी नौका संपुर्णत्वा पर्यंत पोहचवली.
वाढतेवयोमान व कामात येत असलेला तोचतोचपणा ह्याचा विचार करीत विवेक ह्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीची सुत्रे ३१ मे २०१६ रोजी खाली ठेवुन पुढील वास्तव्यासाठी पुणे येथे स्थायिक होण्याचे ठरविले. निवृत्ति काळातही बांधकाम संबंधीत कार्यात विवेक मग्न असतात.
कमावलेल्या अनुभवाचा व ज्ञानाचा पुढील पिढीस फायदा व्हावा त्यादृष्टीने मार्गदर्शनपर भाषणे,करीअर मार्गदर्शन,बांधकाम संबंधित कांही कंपन्यांच्या बोर्डावरही गैर कार्यकारी मेंबर म्हणुनही विवेक कार्यरत आहेत.
श्री.विवेक इंग्लंड मधील प्रसिध्द ‘इन्सटीट्युट ऑफ सिव्हील इंजीनीअर्सचे मानद सभासद होते.त्यांनी ‘अमेरीकन कॉन्क्रीट इन्सटीट्युटच्या’ इंडीयन चाप्टरच्या बोर्डवर देखील सभासद म्हणुन काम केले आहे.
श्री.विवेक ह्यांना त्यांच्या विविध कामगिरींद्दल अनेक पारितोषिके देवून गौरविण्यात आलेले आहे.त्यापैकी कांही खालील प्रमाणे:
१) जीवन गौरव पुरस्कार २०१५ – अमेरीकन कॉन्क्रीट इन्सटीट्युट,युएसए – कॅनसास येथे प्रदान
२) उद्योग रत्न पुरस्कार – इन्सटीट्युट ऑफ इकॉनॉमिक अफेअर ऑफ इंडीया – दुबाई येथे प्रदान
३) कॉरपोरेट स्ट्रॅटेजिस्ट ऑफ द ईयर चाणक्य पुरस्कार २०१४ –पब्लिक रीलेशन कॉन्सिल ऑफ इंडीया—मुंबई येथे प्रदान
४) मॅनेजर ऑफ द ईयर पुरस्कार २०१४ – हैदराबाद मॅनेजमेंट ऍसोसिएशन – हैदराबाद येथे प्रदान
५) इन्फ्रास्ट्रक्चर पर्सन ऑफ द ईयर पुरस्कार २०१५ – कन्सट्रक्शन वीक मॅगेझीन – मुंबई येथे प्रदान
६) जीवन गौरव पुरस्कार २०२२—इंडीयन कॉन्क्रीट इन्सटीट्युट – नवी दिल्ली येथे प्रदान